महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक


 


शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर शाहू महाराजअसे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.



आरक्षणाचे प्रणेते-
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.

तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून माणूसम्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात काडीमोडसंबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात काडीमोडसंबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही काडीमोडघेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.

वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.

कलाकारांना प्रोत्साहन
शाहूंनी कलाकार मंडळींना राजाश्रय देऊन कलेचा सन्मान केला.बालगंधर्व, केशवराव भोसले यासारखे कलावंत, हैदरबक्षखॉं, केसरबाई, अल्लादियाखॉं यासारखे गायक, बाबूराव पेंटर,आबालाल रहिमान यासारखे चित्रकार शाहूंनी घडविले.मल्लांना उदार हस्ते प्रोत्साहन दिल्यामुळे कोल्हापूर हे भारतातील कुस्तीचे माहेरघर बनले.कुस्तीगिरांसाठी त्यांनी कोल्हापूरात खासबाग येथे भव्य मैदान बांधले.स्वत: शाहूराजे उत्कृष्ट मल्ल होते.
शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

रयतेचा राजा
आपल्या आयुष्यात त्यांनी सदैव रयतेचा विचार केला.त्यामुळे रयतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिली.द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनामुळे ते खचले.अशातच मधुमेहाचा विकार बळावल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली.ता.६ मे १९२२ रोजी मुंबईला त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा वाली काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्यानंतर त्यांचे थोरले पुत्र राजाराम गादीवर आले.
राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदाकरता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.
तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी  हिंदी भाषांत काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम्सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते. 


झाड झडुले शस्त्र बनेंगे , भक्त बनेगी सेना 

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे 

१९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी ,यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्याभजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले. 

महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली. 

१९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्वमानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे 

ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूरनेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

ग्रामगीता ही राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचं सार. अनेक संतांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले. पण अशी गावाच्या विकासाचा मार्ग सांगणारी ही गीता केवळ अद्वितिय आहे. आजही त्यातलं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान भुरळ पाडणारं आहे.ग्रामगीता नाही पारायणासी ', असं राष्ट्रसंत कठोरपणे सांगतात. 
देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरुन त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं.
ग्रामगीता या काव्यात तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।


संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व नाही दगडात
देवाचं देवत्व नाही लाकडात
सोन्याचांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

भाव तिथं देव ही संतांची वाणी
आचारावाचून पाहिला का कोणी
शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
मी-तू मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
                  ११ ऑक्टोबर १९६८ रोजी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. १२ ऑक्टोबर सकाळी ध्यानाचा कार्यक्रम झाला. एका सुशोभित ट्रकवर राष्ट्रसंतांचा चिरनिद्रा घेत असलेला देह ठेवला गेला आणि भजनाच्या निनादात दास टेकडीचं दर्शन घेण्यासाठी दिंडी निघाली. आयुष्यभर राष्ट्रसंतानी दिलेला मानवतेचा संदेश ह्या अंत्ययात्रेत दिसत होता. सर्व धर्म , पंथ , संप्रदायाचे लोक यात सहभागी होते. गुरुदेव सत्संग मंडळ देशभर त्यांचा विचारांचा प्रसार करण्याचे काम करते.
गाडगे महाराज
"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे  गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."
गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधूइत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक गाडगे बाबाम्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच लोकसंस्कारपीठबनविले होते.
सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनीएकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबाम्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाहीअसे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळसअसे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाया भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
संक्षिप्त चरित्र
·                     गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
·                     ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
·                     १९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
·                     १९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
·                     १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
·                     "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
·                     फेब्रुवारी ८इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
·                     गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
·                     १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
·                     गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
·                     "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
·                     आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
·                     १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
·                     १९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
·                     गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
·                     डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
·                     २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
·                     गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

पंजाबराव देशमुख 


  शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेतृत्व! 

भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ!
          
          पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेअमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.
संक्षिप्त चरित्र

1.                   डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम
2.                  १९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
3.                  वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
4.                  १९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
5.                  १९२६ - मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
6.                  १९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
7.                  १९३२ - श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
8.                  ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.
9.                  १९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
10.               १९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
11.                १९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
12.               'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.
13.               १८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
14.               १९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
15.               लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
16.               १९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
17.               देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
18.               प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
19.               १९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
 
शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा ! असा संदेश देणारे   धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे भारतीय राज्याघात्नेचे शिल्पकार व आधुनिक युगातील महामानव!   डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

       कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य  मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते.
            डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  हे मराठीभारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
            मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच नार्मल स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
             डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
                  भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोलीयेथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला!
                 इ.स. १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
                 रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात दी प्रॉब्लेम ऑफ रूपीहा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
                 भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठीत्यांनी मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०)  आणि प्रबुध्द भारत’ (१९५६)  अशी वृत्तपत्रे  चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,  ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय थॉटस् ऑन पाकिस्तानहा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक  असण्याबरोबरच स्वत: एक  वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या दख्खनचा दिवाया नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शनया नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जातीया ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.
                डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता. 

डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा  होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग  लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी  समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते सुशिक्षितझाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.
डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण

           डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातून धर्मही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होती त्याच वेळी बऱ्याचशा सामाजिक असमानतानां धार्मिक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत किमान पक्षी बऱ्याच वेळी विविध धर्म संस्था समतेचे पाठही देत असल्या तरी खर्‍या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेची पाठराखण करण्यास अयशस्वी झाला.
           भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला.
           भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मियांची भारतात दीर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेत होणार्‍या दलित शोषणास थांबवण्यासारखे बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला, अशीच काहीशी परिस्थिती इतरही समतावादी समजणार्‍या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बऱ्याच धर्मातील स्त्रियांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्वीकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
             बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
           इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
          इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले.

पुणे करार
                       इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणर्‍या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.
          इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती.
          जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले.
राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
                 एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्‍या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले.
             मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही.
            पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच.
             २० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी.
            २९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची मसुदा समितीनियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
राज्यघटनेचे शिल्पकार,’ ‘अस्पृश्योध्दारकअसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले. 
        आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही नास्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

             
अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह भीमजी रामजी आंबेडकरयांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयेथपर्यंत झाला.निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते!