गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात ?


सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे हे समजून घेऊ या...

गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती. माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे, असे विज्ञानानेही मान्य केले आहे. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यात असतो, अशी मान्यता आहे.

मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली आहे. भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. हा अवतार पाण्यात जन्मास आला. त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्य स्थान आहे. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.
गणपती बाप्पाचे वाहन उंदीरमामाकडून शिका यशस्वी जीवनाचे फंडे

धर्म शास्त्रानुसार देवी-देवतांचे वेगवेगळे आणि विचित्र वाहन आहेत. साधारणपणे हे वाहन अंध:कार आणि अज्ञानाचे प्रतीक असतात आणि संबंधित देवता या शक्तींचे नियंत्रण करतात. गणपतीचे वाहन आहे मूषक अर्थात उंदीर. गणपतीचे वर्णन 'विशालकाय' या शब्दाने केले जाते. परंतु मूषक मात्र लघुकाय आहे. लाईफ मॅनेजमेंटचे अनेक फंडे आपल्याला हा उंदीरमामा सांगतो. या गोष्टी आत्मसात केल्यास आपले जीवन यशस्वी बनते.

उंदीर बिळात राहतो. आपल्याला बिळातील उंदीर दिसत नाही. ईश्वराचेही असेच आहे. तो सर्वत्र व्याप्त आहे, तरीही सहजगत्या दिसत नाही. मोह, माया, अज्ञान, अविद्या यामुळे आपण देवाला पाहू शकत नाही. त्यामुळे आपण अहंकाराचा त्याग करून परमात्म्याला समजून घ्यावे. त्याची उपासना करावी.

गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानदेवता आहेत. त्यांचे वाहन असलेला उंदीर कोणत्याही पदार्थाचे तुकडे-तुकडे करून टाकतो, त्यानुसार आपणही आपल्या बुद्धीच्या प्रभावाने जीवनातील समस्यांचे तुकडे-तुकडे अर्थात विश्लेषण केले पाहिजे. सत्य आणि ज्ञानापर्र्यंत पोहोचले पाहिजे. ज्या लोकांवर बाप्पांची कृपा असते त्यांना बुद्धी आणि ज्ञान मिळते.

बिळात लपून बसणारा अंध:कारप्रिय प्राणी म्हणजे उंदीर. अंधकार आणि नकारात्मक विचारांचा त्याग केल्यानंतरच माणसाच्या जीवनात यश प्राप्त होते.

उंदीर सदैव सतर्क आणि जागरूक असतो. आपणही कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उंदीर अन्नधान्याचा शत्रू आहे. आपली संपत्ती, धान्य आदी सांभाळून ठेवण्यासाठी विनाशकारी जीवजंतुंवर नियंत्रण मिळविले पाहिजे. त्याचप्रकारे आपल्या जीवनात जे लोक हानी पोहोचवू शकतात, अशांवर नियंत्रण मिळविले पाहिजे. असे केल्यास जीवनातील समस्या दूर होऊन जीवन यशस्वी बनते