१० वी नंतरच्या संधी


हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना नेहमीच पडलेला असतो. दहावीच्या प्रमाणपत्रावर आजच्या काळात नोकरी मिळणे किंवा व्यवसायासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे अवघड असल्यामुळे, दहावीच्या पुढेही आपले शिक्षण / प्रशिक्षण सुरु ठेवणे हे आजच्या माहितीच्या युगात क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे स्वत:ची क्षमता, आवड, इच्छा व प्राप्त संधी यांची सांगड घालून भावी आयुष्याची दिशा ठरविणे योग्य ठरते.
त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिक प्रयत्न फलदायी ठरतात. दहावीनंतर शिक्षणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
तांत्रिक शिक्षण
उच्च माध्यमिक शिक्षण (कला, वाणिज्य, विज्ञान)
१) व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कमी कालावधीत अर्थार्जन देणारे शिक्षण म्हणून ह्या शिक्षणाकडे पाहिले जाते. हे शिक्षण साधारणत: १ ते ३ वर्ष कालावधीचे असते. किमान कौशल्यावर आधारित हे शिक्षण असल्यामुळे हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना छोटासा व्यवसाय सुरु करता येतो तसेच उद्योगधंद्यामध्ये कुशल कारागीर म्हणून नोकरी करता येते.
२) तांत्रिक शिक्षण कारखान्यांमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्य करण्यासाठी व मध्यम दर्जाचे उद्योगधंदे सुरु करण्यासाठी तांत्रिक शिक्षण हे उपयोगी ठरते. साधारणतः दहावीनंतर ३ ते ४ वर्षांचे अभ्यासक्रम असतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गणित व विज्ञान ह्या विषयात विद्यार्थ्यास गती असावी लागते. ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने दहावी परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
३) उच्च माध्यमिक शिक्षण १० वी नंतर पदवी व त्यानंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. साधारणतः कला, वाणिज्य व विज्ञान ही उच्च माध्यमिक शिक्षणाची मुख्य अंगे आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येते.