उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्याकरिता उद्योग समूहांचा सहभाग अत्यंत निकडीचा आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ऍप्रेंटीस ऑक्ट १९६१ अमलात आणला आहे. ह्या कायद्यान्वये
मोठया उद्योगसमूहांना त्यांच्या एकूण कुशल मनुष्यबळाच्या काही प्रमाणात शिकाऊ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंद्यात मिळून दरवर्षी एकूण अंदाजे ५५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची योजना अंमलात आणली आहे. ह्या प्रशिक्षणार्थींना केंद्र शासनातर्फे ठराविक विद्यावेतन देण्यात येते.या योजनेअंतर्गत १६४ विविध तांत्रिक व अतांत्रिक (ट्रेड्स) विद्याशाखामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. अनेक विद्याशाखांसाठी १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थांची निवड करण्यात येते. काही ठराविक विद्याशाखांसाठी ८ वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थींची निवड वर्षातून दोन वेळा (साधारणत: जानेवारी ते एप्रिल व जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी) करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणार्या व उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यास संबंधित संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येते.
सदरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला कुशल तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळू शकते वा तो स्वत: छोटासा व्यवसाय उभारू शकतो.
या योजनेअंतर्गत असलेल्या विविध १६४ ट्रेड्सच्या यादीसाठी व अधिक माहितीसाठी खालील दर्शविलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा
www.dvet.gov.in, List of 100 ITI's Center of Excellence, DGET.NIC.IN